आमची भूमिका
- Home
- आमची भूमिका
नमस्कार!
शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या नेवासा तालुका ॲग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड मध्ये आपले स्वागत आहे!
शेतकऱ्यांनी एकत्र येवून आपल्या शेतमालाला बाजारपेठ मिळवावी अन् नफा कमवावा या हेतूने शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून हा ऑनलाईन प्रकल्प सुरू करत आहोत.
यापूर्वी, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला दर मिळावा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती ही संस्था अस्तित्वात आली. परंतु अनेक ठिकाणी राजकीय कोतेपणा मधून कृषी उत्पन्न बाजार समितीला कुलूप लावून ठेवले गेले. अशावेळी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करणे हा एक पर्याय शासनाकडून उपलब्ध केला गेला. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यासाठी लागणारा दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे ही संकल्पना फक्त तुरळक ठिकाणी अस्तित्वात आली. राजकीय आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जागतिक बाजारपेठेचे दार उघडून देणारी संकल्पना नेवासा तालुका ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड सर्व शेतकरी, कृषी प्रक्रिया उद्योजक, बारा बलुतेदार, कारागीर, गृहउद्योग, महिला उद्योजिका, बचत गट यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. आणि अत्यंत आनंदाची अन् महत्वाची बाब म्हणजे, अन्य सर्व अ-कृषी उत्पादक (कपडे, खेळणी, फर्निचर, शालेय साहित्य, वाहने, इत्यादी इत्यादी) देखील यामध्ये भाग घेऊ शकतात.
यापुढील काळात, शेतकरी अन् अन्य सहयोगी उत्पादकांना एकत्र करून तालुका स्तरावर कृषी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीचे हे पहिले पाऊल आहे…!
सर्व शेतकरी, उद्योजकांनी, व्यावसायिकांनी, पुढील लिंक वर क्लिक करून तिथे दिलेली माहिती भरावी
आणि जगासोबत व्यापार करायला सुरुवात करावी. कुठल्याही बंधनांशिवाय खुल्या व्यापार नितीचा आनंद घेत आपली उत्पादने गल्ली ते दिल्ली च्याच बाजारपेठेत विक्री करावीत. त्यासाठी ग्राहकांना आवश्यक असणारी सर्व प्रकारची कुरिअर वाहतूक सेवा देखील योग्य दरात तिथेच उपलब्ध आहे.
सर्वांना सर्वकाळ हार्दिक शुभेच्छा !
धन्यवाद !
डॉ. भारत नादरबाई गंगाधर करडक – पाटील
(संस्थापक, नेवासा तालुका ॲग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड, नेवासा)